daboard

इतिहास

देवगड एज्युकेशन बोर्ड

देवगड एज्युकेशन बोर्डाची स्थापना ९ डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत झाली. मराठी भाषेतील नामवंत साहित्यीक साहित्यसम्राट कै. न. चि. तथा तात्यासाहेब केळकर हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. देवगड एज्युकेशन बोर्ड ही देवगड (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील पहिली शिक्षणसंस्था होय. विसाव्या शतकाच्या प्रारंभी हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने जनता झपाटलेली होती. स्वातंत्र्याबरोबरच देशातील जनतेला शिक्षित करणे आवश्यक असल्याची जाण त्या काळच्या समाजधुरीणांना होती. टिळक, आगरकरांसारख्या सामाजद्रटयांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळ्या शिक्षणसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला होता. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून देवगड तालुक्यात शिक्षणाची सोय करण्यासाठी व तालुक्याची सामाजिक व आर्थिक उन्नति करण्यासाठी त्या वेळचे देवगड तालुक्यातील ध्येयनिष्ठ व द्रष्टे समाजसेवक आपापल्या परीने प्रयत्नशील होते. त्यावेळी मुंबईत नोकरी व व्यवसायांच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या देवगड तालुक्यातील शिक्षण प्रेमी मंडळींनी एकत्र येऊन देवगड एजुकेशन बोर्डाची स्थापना केली. देवगड एज्यूकेशन बोर्डाच्या स्थापनेत कै. डॉ. वि. ना. तथा बाबासाहेब रेगे, कै. भास्करराव गोगटे, कै. रावबहादूर, श्रीधर ग. आचरेकर, कै. म. द. पाटणकर, कै. रा. वा. नेने, कै. वा. वा गद्रे, कै. ना. श्री. वेलणकर, कै. ज. न. काळे, कै. गो. रा. बापट, कै. ना. शि. नाडकर्णी, कै. त्र्यं. ग. मराठे, कै. ध. भ. मयेकर, कै. प. शि. राणे इ. शिक्षणप्रेमी मंडळींचा पुढाकार होता. देवगड येथे सन १८८० पासून कै. पांडुरंग कृ. कारेकर, कै. भास्करराव गोगटे, कै. मोरोपंत गोगटे, कै. वासुदेव स. मराठे, कै. शंकरराव कुलकर्णी आदी समाजसेवकांनी इंग्रजी शिक्षणाचे वर्ग चालवून शिक्षणदानाचे कार्य चालू ठेवले होते. पुढे कै. रावबहादूर आबासाहेब वळंजू, कै. आबासाहेब नाडकर्णी व कै. गोपाल लक्ष्मण तथा भाऊसाहेब जोशी यांच्या पुढाकाराने देवगड येथे “एल. आर. जोशी मेमोरीअल श्रीराम इंग्लीश स्कूलची” स्थापना करण्यात आली. व देवगड तालुक्यात खऱ्या अर्थाने शिक्षणाची मुहार्तमेढ रोवली गेली. देवगड एजुकेशन बोर्डाने संस्था स्थापनेचे सर्व कायदेशीर व इतर सोपस्कार पूर्ण करून १९३४ साली देवगड येथे शाळा बांधण्यासाठी २‌‍‍‌ एकर जमिन खरेदी केली. या जमिनीवर ३१ डिसेंबर १९३४ रोजी साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. दानशूर व्यक्तींना दिलेल्या देणग्यांच्या आधारे १९३५ अखेर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. बोर्डाची प्रगती व सुस्थिती पाहून श्रीराम इंग्लीश स्कूलच्या संचालकांनी १ नोव्हेंबर १९३५ रोजी “श्रीराम इंग्लीश स्कूल” ही शाळा सुयोग्य संचालनासाठी देवगड एजुकेशन बोर्डाच्या ताब्यात दिली. बोर्डाच्या स्थापनेच्या वेळी बीजरूपाने असलेले कार्य श्रीराम इंग्लीश स्कूलच्या रूपाने बहरू लागले. १९३७ च्या सुमारास कै. रावबहादूर, श्री. ग आचरेकर यांनी त्यांचे स्नेही हरीभाई कल्याणजी यांच्या माध्यमातून शेठ मफतलाल “गगलभाई यांच्या बोर्डाशी संबंध जूळवून आणला. व त्याचा परिपाक म्हणजे श्रीमंत शेठ मफतलाल गगलभाई यांनी दिलेल्या उदार व भरघोस देणगीमुळे “श्रीराम इंग्लीश स्कूल”चे “शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल” असे नामकरण दि. ९ एप्रिल १९३८ रोजी करण्यात आले. देणगीदारांनी दिलेल्या लहान मोठ्या देणग्यांमधून शाळेच्या परिसरात एकेक इमारती उभ्या राहू लागल्या. अशाप्रकारे एक एक वर्ग वाढून शेठ म. ग. हायस्कूलचे पूर्ण हायस्कूल मध्ये रुपांतर झाले. आणि १९४१ पासून या शाळेतील विद्यार्थी मॅट्रीकच्या परिक्षेस बसण्यास सुरवात झाली. देवगड जवळील वाडे या गावीही तेथील स्थानिक मंडळी शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत होती. वाड्यात इंग्रजी शिक्षण देणारे हायस्कूल व्हायला पाहिजे. हा ध्यास तेथील शिक्षणप्रेमी मंडळींच्या मनात होता कै. दिक्षित गुरुजी, रावबहादूर श्री. ग. आचरेकर, कै. आर. डी. वाडेकर, डॉ. वि. वा. नेने, कै. सं. शि. केळकर, कै. मोरोपंत जोशी, आदिंच्या संघटीत प्रयत्नातून दि. १३ सप्टेंबर १९५५ रोजी “माध्यमिक शिक्षणालय” ही शाळा सुरु करण्यात आली. व त्याच वर्षी सुव्यवस्थापनासाठी सदर शाळा देवगड एजुकेशन बोर्डाकडे सुपद करण्यात आली. संस्थेने वाडे गावच्या मध्यावर असलेली जमिन खरेदी करून शाळेच्या इमारत बांधकामास सुरवात केली. मुंबई येथील “श्रीकृष्ण जगन्नाथ” या पेढीचे मालक कै. श्रीमान जगन्नाथ अनंत केळकर यांनी संस्थेला उदार व भरघोस देणगी दिली. मफतलाल उद्योगाचे कै. अरविंदभाई मफतलाल यांनीही भरघोस देणगी संस्थेला दिली. अशाप्रकारे अनेक दात्यांनी दिलेल्या देणग्यांमुळे शाळेच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. श्रीमान केळकरांच्या इच्छेनुसार “माध्यमिक शिक्षणालय”चे नामकरण “अनंत कृष्ण केळकर हायस्कूल” असे करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास सुप्रसिद्ध साहित्यिक विद्वान पंडित महादेवशास्त्री जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशाप्रकारे अनंत कृष्ण केळकर हायस्कूलचे १९५८ साली पूर्ण हायस्कूलमध्ये रुपांतर होऊन यशस्वी वाटचाल सुरु झाली अशारितीने देवगड एज्यूकेशन बोर्डाच्या सुयोग्य व्यवस्थापनाखाली शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा या दोन माध्यमिक शाळांची यशस्वी वाटचाल सुरु झाली. संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर दोन्ही शाळांच्या इमारती व इतर आवश्यक सुविधा केवळ देणगीदारांच्या उदार आश्रयामुळे आज उभ्या आहेत. दोन्ही शाळांना सुसंस्कृत, कार्यनिष्ठ, सेवाभावी, सुविधा व ध्येयनिष्ठ मुख्याध्यापकांचा लाभ झाल्याने दोन्ही शाळांची प्रगती झपाट्याने व उत्तम प्रकारे होऊन जिल्ह्यातील नामांकित हायस्कूल म्हणून नावलौकीक मिळवलेला आहे.